बहुप्रतिक्षित भुसावळ-बडनेरा-वर्धा तिसऱ्या लाइनचे सर्वेक्षण वर्षभरात पूर्ण

बहुप्रतिक्षित भुसावळ-जळगाव तिसऱ्या लाइनचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्णत्वाच्या मार्गावर असतानाच आता भुसावळ-बडनेरा-वर्धा

भुसावळ– बहुप्रतिक्षित भुसावळ-जळगाव तिसऱ्या लाइनचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्णत्वाच्या मार्गावर असतानाच आता भुसावळ-बडनेरा-वर्धा या ३१५ किमी अंतराच्या रेल्वे मार्गासाठीचे सर्वेक्षण गेल्या वर्षभरात पूर्ण झाले आहे. अाॅगस्टच्या पहिल्या अाठवड्यात सर्वेक्षणाचा अहवाल रेल्वे बाेर्डाला सादर करण्यात आला. या प्रकल्पावर २२ हजार काेटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे.

गेल्या दशकभरापासून भुसावळ विभागातील रेल्वे मार्गावर गाड्यांची संख्या वाढल्याने तिसऱ्या रेल्वे लाइनची गरज भासू लागली. तसेच दोन गाड्यांमधील अंतरही कमी होत आहे. त्यामुळे तिसऱ्या रेल्वे लाइनसाठी भुसावळ विभागातील बडनेरा स्थानकापासून पुढे नागपूर विभागातील वर्धा स्थानकापर्यंतचे सर्वेक्षण करण्यात आले. तर भुसावळ – जळगाव तिसऱ्या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली. या लाइनचे पहिल्या टप्प्यातील १२ कि. मी. चे काम पूर्णत्वास आले आहे. त्याची प्राथमिक चाचणीही पूर्ण झाली आहे. वर्षभरात या मार्गावरील तिसरी लाइन दळणवळणासाठी सुरू केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर ३१५ कि. मी. चे भुसावळ – बडनेरा-वर्धा मार्गाचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणाचा गोषवारा तयार करुन तसा अहवाल रेल्वे मंडळाकडे पाठवला आहे.

गाड्यांची संख्या वाढणार – सुरत-जळगाव या रेल्वे मार्गाच्या दुहेरी करणासोबत भुसावळ – भादली या तिसऱ्या रेल्वे लाइनचे काम पूर्णत्वास आले आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून जाणाऱ्या रेल्वेची संख्या वाढणार आहे. भुसावळातून नागपूर, सुरत अाणि जळगाव या तिन्ही मार्गांवर तिसरी लाइन टाकून झाल्यावर विभागातील गाड्यांचा वेग वाढेल. तसेच अाऊटरला गाड्या थांबवण्याचे प्रकार कमी होईल. गुजरातकडे जाणाऱ्या मालगाड्या जळगावला न थांबता थेट धावू शकतील, त्यामुळे वेळेची बचत हाेणार अाहे.

तिसऱ्या, चौथ्या रेल्वे लाइनसाठी डेड लाइन – भुसावळ-जळगाव या २४ कि. मी. च्या तिसऱ्या रेल्वे मार्गानंतर चौथ्या मार्गासाठी लवकरच काम सुरू होईल. या अंतरात तिसरी लाइन झाल्याने अाता चाैथ्या लाइनचे काम सुरू होईल. त्यामुळे तिसरी लाइन २०२० पर्यंत तर चाैथी रेल्वे लाइन २०२१ मध्ये वाहतुकीसाठी खुली केली जाणार आहे.

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail